The Super Woman

‘The Super Woman’ हा तर जणू कोणी आपल्याला दिलेला अदृश्य किताबच आहे. माहेरी कधीही काम न करणारी मुलगी, नवीन लग्न झाले की, प्रत्येक काम अंगावर घेऊन अगदी मनापासून करत असते. नवऱ्याच, सासू – सासऱ्यांच, येणारे – जाणारे, घरातील इतर कामे असो किंवा बाहेरून काही आणणं असो. अशी एक ना अनेक कामे ती सतत करत असते. हे सगळ करत असतात, कोणी नाराज तर नाही ना होणार, कोणाच मन तर नाही ना दुखावणार, आपण सगळ व्यवस्थित , निटनेटकं करतोय ना हीच भावना सतत घेऊन ती जगत असते. त्यात ती नोकरी करणारी असेल तर आणखीच भर पडते. या सगळ्यात एखाद – दोन वर्षे निघून जातात. आता घरात अजून एक मेंबर येतो, मग त्या बाळाचे सगळे करा. हळूहळू ते मोठे होते. त्याची शाळा, अभ्यास, इतर क्लासेस या सगळ्यामध्ये हिची तारेवरची कसरत मात्र वाढत जाते.
ही वर्षानुवर्षांची तारेवरची कसरत करता करता ती स्वतःलाच विसरून जाते. गेल्या कित्येक वर्षाने तिने स्वतःला नीट आरशात पाहिलेले ही नसते. कधी स्वतःचा विचार केलेला नसतो, इतकेच काय तर स्वतःच्या आवडी निवडी सुद्धा विसरून जाते ती.
अशा तिला जर काही प्रश्न विचारले तर बघा काय उत्तर मिळतात.
तुला कोणती भाजी आवडते ?
अग मला काहीही चालत जे सगळ्यांसाठी करते ते सगळच खाते मी.
तुला आवडता गोड पदार्थ कोणता ?
निरुत्तर………..
तुला आवडणारा रंग कोणता ?
निरुत्तर………
पण हीच ती लग्ना आधी मात्र आवडीची भाजी नसली कि जेवायची नाही. तिच्या वाढदिवसाला तिच्या आवडीचेच पदार्थ आई बनवायची. हे ही ती विसरून जाते कारण, ती आता सगळ्यांची आई झालेली असते, होय ! नवरा, सासू – सासरे, मुल सगळ्यांचीच आई. या सगळ्यात ती स्वतःला कुठेतरी हरवून बसलेली असते.
मी – माझ – च अस्तित्व संपलेले असते.
ती खूप चिडचिडी झालेली असते, शरीराचा आकार तर पूर्णपणे बदलेला असतो. कारण येवड्या वर्षात कधीही स्वतःकडे लक्ष न दिल्या मुळे तिच्यात झालेले बदल तिच्या लक्षातही येत नाहीत.
पण……जेंव्हा मुलांची १० वी संपते तेव्हा लक्षात येते की आपल्या भोवती फिरणारी, आपण त्याचं जग असलेली मुलं मात्र आता दूर जातायत. त्यांना आता याच आईची अडचण होते किंवा त्या सुरवंटाच फुलपाखरू झाल्यावर झाडाच्या फांदीची गरज बऱ्या पैकी संपलेली असते. उडण्यासाठी नवीन आकाश मिळालेले असते. नवराही आता या सगळ्याला सरावलेला स्वतःच्या विश्वात रमत असतो. कोणाचे सासू – सासरे जग सोडून जातात तर कोणी वेगळे राहतात. हळू हळू तिची गरज संपत जाते हे मात्र नक्की.
अशावेळी बऱ्याच स्त्रिया खचून जातात किंवा डिप्रेशन मध्ये जातात. कारण ज्यांच्या साठी आयुष्याची एवढी वर्षे खच्ची घातली. त्यांनाच तिची गरज संपलेली असते हे तिच्या लक्षात यायला लागते.
पण अशा वेळी डिप्रेशन मध्ये न जाता, हीच ती खरी वेळ असते स्वतःला बदलण्याची खर तर हे अगदी सुरुवाती पासूनच करणे अपेक्षित असते पण हिंदू संस्कृतीत हे घडणे अशक्य आहे. पण हो हे आपण आपल्या मुलींना म्हणजे आताच्या पिढीला नक्कीच सांगू शकतो.
असो, तर आता हा टर्निंग पॅाइंट असतो तिच्या आयुष्याचा आता मात्र तिने बदलणे गरजेचे आहे. स्वतःकडे बघणे गरजेचे आहे. त्यासाठी सगळ्यात आधी तो सुपर वूमनचा किताब बाजूला फेकून देण होय ……..! फेकून देण फार महत्वाच आहे. Let it go म्हणण महत्वाच आहे.
नाही केला एक दिवस तिने चहा तर बिघडल कुठ ? करावा की घरातल्या कोणीतरी मुलांनी, नवऱ्याने काय बिघडल. करावा आणि तिलाही द्यावा की. एक दिवस उठावे तिने पण उशिरा रोजच काय घड्याळाचा काटा सांभाळायचा आणि सकाळ झाली की किचनचा तांबा घ्यायचा. दे सोडून किमान एखाद्या रविवारी. कधीतरी होऊ देत सगळ्यांना जाणीव तुज्या अस्तित्वाची.
दे वेळ स्वतःसाठी बघ आरशात स्वतःला किती बदलली आहेस तू ?
लग्नाआधीची तू आणि आत्ताची तू. अग डबल झाली आहे तुझ्या शरीराची प्रॉपर्टी काय करणारेस तिचं ? त्या प्रॉपर्टीसाठी कोणीही भांडणार नाही गं, उद्या तू म्हातारी झाल्यावर. आणि आणखी काही दिवसांनी तुलाच त्रास होणार आहे याचा. उठता बसता गुडघे धरावे लागतील. आणि बाकीचा त्रास वेगळाच. मग काय करायची ही प्रॉपर्टी……….?
बस ! ठरल आता ! कमी करूया ही प्रॉपर्टी सगळ्यात आधी स्वतःसाठी वेळ काढ. घरातल्या कामाचे नियोजन कर. प्रत्येकाला त्याची कामे वाटून दे. होय…….. कारण आता नाहीये मी सुपर वूमन. नक्कोच आणि मला राहायचे ही नाही सुपर वूमन म्हणून. बास आता……….तर ठरले स्वतःच्या वेळेचे नियोजन, घरातील बाकी कामांच्या वेळा ठरव.
तू कमावती असलीस तर प्रश्नच नाही. नसलीस तरीही नवऱ्याशी बोलून बघ तो नाही म्हणार नाही. थोडा खर्च होऊ दे. एखादी छान किंवा खिशाला परवडेल अशी जिम किंवा योगा सेंटर निवड. अगदीच नाही तर मॉर्निंग वॉकला जा. व्यायामाला लाग. स्वतःच्या खाण्या – पिण्याकडे लक्ष दे. स्वतःच्या आवडी – निवडी जोपास. हा पण हे सगळ करत असताना घराकडेही लक्ष असू दे बरं का ! उडायचे तर आहे आहे पण घार होऊन घरट्याकडे लक्ष ही द्यायचे आहे.
मग बघ एवढ्या वर्षात तुझ्या मुळे चिडचिडा झालेला नवरा सुद्धा कसा रोमँटीक होईल. त्यालाही आवडेल हे बदलणारे रूप, मग तो ही मदत करेल या सगळ्यात. खर तर आधीच केली असती पण तू त्याला एवढ्या वर्षात कधी जाणीवच करून दिली नाहीस, तर असो. देर ही सही शुरुवात तो हुई. अस म्हणूया हव तर. आणि हो तू जर गृहिणी असशील तर काहीतरी स्वतःचे काम सुरु कर. हो नक्कीच जमेल का नाही जमणार ? अग जी बाई घराच मॅनेजमेंट करू शकते ती काहीही करू शकते…. समजल ना…….. ! थोडा विश्वास ठेव सखे स्वतःवर, अशी ग कशी तू………..
लग्न होऊन सासरी आली होतीस तेव्हा म्हणाली होतीस का, की हे मला कसे जमेल, याचा कधी विचार तरी केला होतास का ? पण जमले ना सगळ… तर मग. हे ही सोप आहे. काय करायचे, आपल्याला काय आवडत होत, छंद कोणता आहे याचा थोडा फ्लॅश बॅक मध्ये जाऊन विचार करायचा. संपल सापडलं उत्तर आणि त्याच गोष्टींवर थोडा विचारपूर्वक प्लॅनिंग करून काम सुरु करायचं आणि हो वाटत असेल अजूनही अवघड तर घाबरता कशाला. आपली सेना आहे ना मागे, नवरा आणि मूलं. हो खूप मदत होते त्यांची नवरा नवनविन आयडिया पण देईल आणि जे काही जुजबी फोन किंवा कंप्युटर वापरायची गरज पडलीच तर, मुल तर एक नंबरच ! लगेच समजावून सांगतील. हा या सगळ्याला थोडा वेळ, थोडा विचार आणि घरच्यांची साथ हे सगळे दिले ना, तर तू नक्कीच एक स्वतःच नवीन विश्व उभ करू शकतेस.
पण पुन्हा एकदा हे लक्षात ठेव की नको तो सुपर वुमनचा किताब. तुझ्या कामाच्या नादात जर झालेच घरातल्या कुठल्या कामात दुर्लक्ष तर होऊ देत. काही फरक पडत नाही कारण आता नवरा आणि मुल आहेत ना तुझ्या सोबत………. मग !
आणि हो आता सगळ्यात महत्वाच हे कि, आत्ता मी हे सुरु केल लोक काय म्हणतील ? तर हे बाजूला ठेव लोकांना काय गं, ते तस ही बोलतच असतात बोलू देत त्यांना, त्यांच्या बोलण्याचा आपल्या कोणत्याही कामावर परिणाम नाही होऊ द्यायचा.
खर सांगू मनातलं ?
‘दुनिया गई भाड में, में अपनी मस्ती में’ हा अॅटीट्यूड ठेव, पण घरच्याना सोबत घेऊन. मग बघ कशी मस्त भरारी घेशील.
आणि आता खरी सुपर वूमन होशील. तुझ्या नवऱ्यासाठी आणि मुलांसाठी. आता त्यांना तुझा अभिमान वाटेल !!
Yes, Now You are The Super woman !
Yes, I am The Super Woman !!!
Feeling so Proud !!
Thank you so much my hubby & my lovely daughters !!!
For being with me in this journey of Super Woman !!!