Menstruation and Reiki Meditation – मासिकधर्म आणि रेकी
मासिकधर्म आणि देव पूजा
क्लास मध्ये काही जणी मला नेहमी प्रश्न विचारतात कि, पिरियड्स मध्ये रेकी शिकली किंवा रेकीची दीक्षा घेतली किंवा रेकीचा सराव केला तर चालतो का ? कारण रेकी ही एक पवित्र उर्जा आहे आणि महिन्याच्या या दिवसात आपण मंदिरात जात नाही, तर मग रेकी च्या बाबतीत कसे ? मासिक धर्मामध्ये स्त्री ने देवळात का जाऊ नये ? ह्या काळात शिवाशिव का पाळली जाते ? मासिकधर्म हा पूर्णतः नैसर्गिक असतो तर हे असे का पाळले जाते ? पण मग रेकी साठी सुद्धा असेच बंधन असेल ना ? रोजची साधना करताना हे चार दिवस सोडून द्यायचे का ?
मग मी विचारले कि, ‘त्या काळात मंदिरात का नाही जात आपण ?’ अर्थातच इथे मंदिरात न जाण्याचे कारण कोणालाही माहित नव्हते, माहीत नसते. त्यांची अंधश्रद्धा हीच कि, त्याकाळात मी अशुद्ध असते. मग शुध्द गोष्टींपासून आपल्याला लांब राहावे लागते. आपली सावली देवावर पडू नये. हे उत्तर येते. आजकालच्या सुशिक्षित जगात ही हे असे उत्तर आले कि मात्र …………. !
मंदिरात न जाण्या मागे फक्त पूर्वापार चालत आलेली अध्यात्मिक कारणे आहेत असेच जवळजवळ सगळ्यांना वाटत असते. परंतु, तसे नाहीये. खरे तर त्या मागे खूप मोठे वैज्ञानिक कारण आहे किंवा सत्य आहे असे म्हणू या.
नेहमीच अध्यात्म आणि विज्ञान हे दोन्ही ही समांतर असतात. परंतु, प्रत्येक वेळी लोकांना वैज्ञानिक कारण समजावून सांगणे पूर्वीच्या काळी शक्य नव्हते, म्हणजे लोकांना ते समजायचे नाही. शिक्षणाचा अभाव , देवाधर्माचे वेड, अंधश्रद्धा , त्यामुळे असेल कदाचित, लोकांना देवाचे कारण सांगून या गोष्टी पटवून दिल्या गेल्या असतील. आणि त्या तशाच रूढी – परंपरा म्हणून पिढ्यानपिढ्या पाळत पुढे आलेल्या असणार.
त्याचे उत्तर देण्याचा मी माझ्यापरीने प्रयत्न करत आहे. यासाठी मी एका स्त्रीरोगतज्ञांच्या लेखाचा आधार घेत आहे. ( मला आत्ता त्यांचे नाव आठवत नाही, नाहीतर त्यांच्या नावाचा उल्लेख करायला मला नक्कीच आवडले असते. ) त्यांनी ही अतिशय अभ्यासपूर्ण माहिती दिली आहे. याच्या मदतीने रेकीचा आणि याचा कसा संबंध येत नाही हे माझ्या परीने समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे.
मासिक पाळी ही नैसर्गिक आहे.
१. भारतातील सर्व प्राचीन मंदीरे, जी शक्तीस्थळं म्हणून ओळखली जातात, ती- जिथे वैश्विक प्राणशक्ती एकवटली जाते अशा उच्च मॅग्नेटिक फिल्ड असलेल्या भूभागावर बांधलेली आहेत. इतर धर्मातील प्रार्थना स्थळांचे तसे नाही.
२. असे मंदिर उभारून झाल्यावर, अध्यात्मिक अधिकारी व्यक्ती कडून त्यातील मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून विश्वातील लाईफ फोर्स एनर्जी त्या मूर्तीमध्ये स्थापित केली जाते. या प्रक्रियेनंतर ते मंदिर केवळ एक प्रार्थनास्थळ न रहाता एक पवित्र शक्तीस्थळ बनते.
३. ज्याप्रमाणे एखाद्या मोबाईल मध्ये सॉफ्टवेअर, हार्डवेअर, बॅटरी इ. वेगवेगळे घटक असतात, त्या प्रमाणे आपले आपल्या स्थूलशरीरा व्यतिरिक्त सूक्ष्म रुपात अनेक पातळ्यांवर अस्तित्व आहे. आधुनिक वैद्यकीय विज्ञानाची झेप अद्यापही फक्त स्थूल शरीरा पर्यंतच जाते, मन, आत्मा किंवा आपली ऊर्जा शरीरे यांच्या बद्दल ते अनभिज्ञ आहे.
४. आपल्या मज्जासंस्थेला समांतर असणाऱ्या ७२००० नाड्यांमधून वैश्विक प्राणशक्ती कार्य करते. या ७२ हजार नाड्या जिथे एकत्र येतात त्याना जंक्शन पॉइंट म्हणतात. हे जंक्शन पॉइंट त्रिकोणाकृती असतात. त्यांना एक ठराविक फ्रिक्वेन्सी असते. त्यामुळे ते गोलाकार भासतात. म्हणून त्याना चक्र म्हणतात. अशी एकूण ११२ चक्रे आपल्या स्थूल देहावर असतात.
५. या नाड्यांच्या संयोगातून आपल्या शरीरात प्राणशक्तीचे वहन होण्यासाठी ची प्रमुख ७ चक्र बनलेली आहेत. ती अशी – सहस्त्राधार, आज्ञा, विशुद्धी, अनाहता, मणिपुर, स्वाधिष्ठान, मूलाधार. प्रत्येक मानवात कुंडलिनी शक्ती मूलाधार चक्रात स्थित असते. ती या प्राणशक्ती च्या मदतीने वर येण्यास मदत होते.
६. हिंदू धर्मात आपल्या मंदिरांचे महत्व यासाठी आहे, की तेथे जाऊन मुलाधारातून आपली ऊर्जा वर उचलली जाण्यास मदत होते.
७. प्रत्येक मानवाच्या शरीरात पाच प्रकारचे ‘वायू’ आहेत. ते म्हणजे, प्राण, समान, अपान, व्यान, उदान. याच बरोबर “प्रसूती” हा उप-वायू सुद्धा आहे, जो अधोमुखी असून स्त्री च्या गर्भाशयात ( स्वाधिष्ठान चक्रात ) स्थित असतो, ज्याला निगेटिव्ह चार्ज असतो, आणि जो प्रसूतीच्या वेळेस बाळाला जन्म देण्यासाठी सहाय्यीभूत ठरतो. स्त्रीच्या मासिक धर्माच्या वेळेस हाच वायू कार्यरत असतो, जो मासिक पाळीचे रक्त हृदयाकडे न नेता, शरीरा बाहेर नेण्याचे कार्य करत असतो.
८. मासिक पाळी दरम्यान स्त्रीने मंदिरात जाऊ नये, किंवा पूजा अर्चना किंवा धार्मिक विधींमध्ये भाग घेऊ नये, याचे वैज्ञानिक कारण हेच आहे, की या काळात अधोमुखी आणि निगेटिव्ह चार्ज असलेला “प्रसूती वायू’ जो स्त्रीच्या शरीरात प्रबळ असतो आणि रक्त बाहेर आणण्याचे कार्य करत असतो, तर प्राचीन मंदिरे आणि आपल्या धर्मातील धार्मिक विधी, हे आपल्या शरीरातील ऊर्जा खालच्या पातळी तून वरच्या पातळीवर नेण्याचे कार्य करतात. हे दोन्ही एकमेकांच्या विरुद्ध होऊन गर्भाशयाच्या कार्यपद्धतीत अडथळे येऊन त्या स्त्री ला वंध्यत्व अथवा इतर गर्भाशयाचे आजार उद्भभवू शकतात.
९. स्त्रीच्या शरीराची रचनाच निसर्गाने अशी केलेली आहे, की तिच्या शारीरिक ऋतुबदलांचे भान न ठेवता जर तिने केवळ स्त्री पुरुष समानतेच्या नावाखाली काही कृती केली, तर नुकसान तिचेच आहे. या परंपरा आपल्या धर्माने किंवा पूर्वीच्या ज्ञात लोकांनी स्त्रीचे आरोग्य जपण्यासाठीच केलेल्या आहेत.
१०. मासिक पाळीच्या दिवसात देवाचे पूजन करू नये किंवा मंदिरात जाऊ नये, किंवा धार्मिक कार्य करू नये हा नियम आपल्या कडे पूर्वापार आहे.. पण याचे शास्त्रीय कारण कुणी सांगितले नाही.
११. मासिक पाळी ही एक नैसर्गिक गोष्ट मानली तरी, जेव्हा ती सुरु होते, तेव्हा स्त्री चे स्वाधिष्ठान चक्र जास्त प्रमाणात सक्रिय आणि सेनसिटीव्ह झालेले असते. ज्या देवघरात, किंवा मंदिरात किंवा एखाद्या सार्वजनिक स्थानी जिथे धार्मिक पूजा विधी सुरू आहेत अशा स्थानी – जिथे आधीच खूप उच्च उर्जा कंपन आहेत, अशा ठिकाणी पूजा किंवा अन्य धार्मिक विधीत सहभागी झाले, तर मासिकधर्म सुरू असलेल्या स्त्रीचे स्वाधिष्ठान चक्र आधीच जास्त सक्रिय असल्याने अशा वेळी ते प्रमाणाच्या बाहेर तिथली ऊर्जा ग्रहण करेल आणि पाळीचा रक्ताचा फ्लो खूप वाढेल. तिला त्रास होऊ शकेल, हेही या मागील कारण असू शकेल.
१२. अगदी नामस्मरण, किंवा एखादा धार्मिक ग्रंथ/पोथी वाचणे यानेही हे होऊ शकते. कारण हे मंत्र जप करताना किंवा धार्मिक ग्रंथ/पोथी वाचताना सुद्धा अशी उर्जा कंपने शरीरात निर्माण होतात. म्हणून या काळात मंत्र पठण करू नये किंवा धार्मिक ग्रंथ – पोथी वाचू नये.
१३. तसेच, दुसरे अतिशय महत्वाचे कारण म्हणजे, मासिक पाळीत स्रवणाऱ्या स्त्रावामधे बाहेरच्या वातावरणातील चांगल्या किंवा वाईट कंपने खेचून घेण्याची शक्ती असते.. (याच कारणा मुळे तांत्रिक पंथा मध्ये यासाठी अशा स्त्रीची पूजा करून वाईट शक्तींना प्रसन्न करण्यासाठी काही अघोरी विधी केले जातात. यावर अधिक खोलात शिरत नाही.) पण वातावरणातील चांगल्या किंवा वाईट कंपने खेचून घेण्याची शक्ती यादरम्यान त्या स्त्रीमध्ये वाढलेली असल्याने, मासिक पाळी मध्ये, रात्रीच्या वेळी उशिरापर्यंत बाहेर राहणे, किंवा वाईट स्पंदनं असलेल्या जागी जावं लागणे, या सारख्या गोष्टींनी बाहेरची बाधा, किंवा निगेटिव्हीटी लागण्याची शक्यता खुप वाढलेली असते.
अगदी चार लोकां मध्ये, किंवा ऑफिस, पार्टी, फंक्शन ई. मध्ये वावरताना सुद्धा अशी स्त्री इतरांची नेगेटिव्हीटी, बॅड मुड्स, कमी दर्जाची नकारात्मक कंपने सहज शोषून घेते. आणि त्यानंतर स्वतःचे एनर्जी क्लीनिंग किंवा सेल्फ हिलींग केले नाही तर त्याचा तिच्या शारीरिक – मानसिक आरोग्यावर दूरगामी परिणाम होऊ शकतो.
हे टाळण्या साठी पूर्वी बाजूला बसणे, ही कल्पना असावी. ज्यांची एनर्जी सेनसिटीव्हीटी जास्त असते, त्यांना हा अनुभव येतो. त्यामुळे केवळ मॉडर्न किंवा सुधारक विचारांच्या नावाखाली या काळात कुठलेही बंधन न पाळता स्वैर वागू नये.
१४. याचबरोबर, याच्या दुसऱ्या बाजूचाही विचार करू. सध्याच्या काळात अगदी बाजूला बसणे वगैरे शक्य नाही, आणि वैज्ञानिक बाजू व्यतिरिक्त या बाबतीत खूप अंधश्रद्धा, गैरसमज, पाळणुकीच्या अनेक अयोग्य पद्धती आपल्या समाजात आहेत. त्यामुळे, एक समतोल सांभाळत, आपण मासिक धर्मामधे मानत / करत / पाळत असलेल्या प्रत्येक गोष्टी बाबत ज्ञान करून घ्यावे आणि मगच त्या फॉलो कराव्यात.
निसर्गतःच स्त्री आणि पुरुष या दोघांना वेगवेगळी शारीरिक जडणघडण लाभलेली आहे. स्त्री पुरुष समानता म्हणजे या वेगळेपणाला पूर्णपणे धुडकावून लावून पुरुषांप्रमाणे सर्व गोष्टी करणे नव्हे. तर आपल्या शरीराला, आपल्यातील स्त्रीतत्वाच्या शक्तीला ओळखणे, तिला जागृत करणे आणि सन्मानित करणे ही खरी समानता म्हणता येईल.
यावर कोणी विश्वास ठेवावा अगर नाही, हा ज्याचा त्याचा प्रश्न.
परंतु या मागील हे खरे कारण समजून घेऊन वागले तर आज काल स्त्रियांना होणारे गर्भाशयाचे अनेक आजार याचे प्रमाण मात्र नक्कीच कमी होईल.
१५. आता प्रश्न रेकी दिक्षेचा किंवा रेकी घेण्याचा. तर आपण बघितले कि, मंदिरात असलेली उर्जा ही आपल्या मुलाधारातील कुंडलिनी शक्तीला वर ढकलण्याचा प्रयत्न करते त्याच वेळी ते उर्जा खालून मूलाधार चक्रातून कार्यरत असल्याने आपल्या स्वाधिष्ठान चक्रावर खालून जोर लागतो. त्यामुळे प्रसूती वायू वर उलट्या दिशेने ढकलला जातो. कुंडलिनी मात्र सुषुम्ना नाडीतून वर येते. म्हणून या उर्जेचा परीणाम गर्भाशया वर होऊ शकतो.
परंतु, रेकीची उर्जा म्हणजेच प्राणशक्ती ही दिक्षा देताना ही उर्जा गुरुकडून चक्र उघडून सहस्त्राधार चक्रातून खाली सोडली जाते. रेकीचा सराव करताना, किंवा साधना करताना ही उर्जा सहस्त्राधार चक्रातून खाली येते अनाहत चक्रा पर्यंत, नंतर तिथून दोन्ही हातातून बाहेर पडते, मग ती पुन्हा मणिपूर चक्रातून आपण आत घेतो आणि मग शरीरात सगळीकडे ही उर्जा पसरते.
या सर्व प्रक्रीये दरम्यान शरीरात खूप सकारात्मकता वाढली कि मग कुंडलिनी शक्ती सुषुम्ना नाडी तून वर येते. या सगळ्या प्रोसेस मध्ये कुठेच स्वाधिष्ठान चक्रातील प्रसव वायुला उलट्या दिशेने ढकलले जात नाही. उलट त्याला खालच्या दिशेने सहज जाण्यास मदत होते. त्यामुळे रेकीच्या दिक्षा, सराव अथवा साधनेच्या वेळी या चार दिवसांचा कधीच अडथळा येत नाही किंवा हे दिवस पाळण्याची गरज नसते.