Colors of Numbers – अंकांचे विविध रंग  

Colors of Numbers – अंकांचे विविध रंग  

आपल्या प्रत्येकाचे आयुष्य रंगांनी भरलेले असते.  रंग आपल्या आयुष्यात रोजच्या जगण्यात खूप मोलाचा भाग घेत असतात. या रंगांचा आपल्या रोजच्या अनेक गोष्टींवर खूप मोठा प्रभाव पडत असतो. रंगांशिवाय  एखाद्याचे अस्तित्व असूच शकत नाही. तुम्हाला वाटत असेल की मी अतिशयोक्ती करत आहे. पण तुम्हीच बघा बरं ! तुमच्या आजूबाजूला असलेल्या प्रत्येक वस्तूला रंग आहे.  आहे ना ? कल्पना करा बरं, सगळीकडे फक्त पांढरा रंग, पांढरी रंगहिन दुनिया असती तर ? बापरे ! एका क्षणातच सरसरून काटा आला ना अंगावर ! कसे जगलो असतो आपण सगळे ? फक्त पांढरं ! ती कल्पना सुद्धा नको वाटते ना करायला, हो ना ?  मग आता बघू या, हे रंग आपल्या आयुष्यात नेमके काय काम करतात आणि त्यांचा आपल्या अंकांशी असलेला संबंध म्हणजे, आपल्या मुलांक आणि भाग्यांका नुसार त्या रंगाचा, त्यांच्या व्हायब्रेशनचा, आपल्या रोजच्या आयुष्यात अजून चांगल्या प्रकारे कसा वापर करून घ्यायचा, ते पाहू.

प्रत्येक अंकाचा स्वामी ग्रह ठरलेला असतो. त्याच प्रमाणे प्रत्येक ग्रहाचा रंग ठरलेला असतो. त्या त्या ग्रहाचा रंग तोच त्या अंकाचा रंग मानला जातो. जसे की

१ – रवी – केशरी, सोनेरी.

२ – चंद्र – पांढरा, क्रीम कलर, चंदेरी.

३ – गुरू – पिवळा.

४ – हर्षल – चित्रविचित्र रंग, मिसमॅच कॉम्बिनेशन मानूया.

५ – बुध – हिरवा.

६ – शुक्र – गुलाबी.

७ – नेपचून – फिका निळा / आकाशी.

८ – शनी – जांभळा, निळा, काळा, ग्रे.

९ – मंगळ – लाल.

प्रत्येक रंगाचं स्वतःचे एक अस्तित्व असतं. त्याच आपल्या आयुष्यातलं काम ही ठरलेलं असतं. प्रत्येक रंगाला स्वतःची अशी एक फ्रिक्वेन्सी असते. ती फ्रिक्वेन्सी आपल्यावर काम करते. आपले शरीर सुद्धा रंगांनी भरलेले आहे. आपल्या शरीरात सप्तचक्र आहेत. जी प्रत्यक्ष दिसत नसतील तरी, ती अदृश्य रूपात आहेत, असे मानले जाते. या सप्त चक्रांचा आपल्या आयुष्यात खूप मोठा रोल आहे. त्यांचे ही रंग ठरलेले असतात.

शरीराचे जर या चक्रांप्रमाणे त्यात येणारे अवयव पाहता सात भाग केले तर, आपले शरीरही पूर्णपणे रंगांनी भरलेले आहे, हे समजते. आपल्या शरीराच्या भोवती असलेले सप्त कोश किंवा औरा बॉडी या पण विशिष्ट रंगांच्या असतात. त्यामुळे आपल्या शरीरातील सप्त चक्र यांचे रंग बदलले किंवा सप्त कोषांचे रंग बदलले तरी आपल्या आयुष्यात चांगले-वाईट बदल होतात. म्हणजे असे म्हणून या की, त्या रंगांची आपल्या सप्तचक्र आणि सप्त कोशांची असलेली  फ्रिक्वेन्सी कमी जास्त झाली तर त्याचा परिणाम होऊन आपल्या आयुष्यात अनेक चांगले-वाईट बदल होत असतात. ही फ्रिक्वेन्सी योग्य प्रमाणात ठेवण्यासाठी कलर मेडिटेशनचा ही खूप उत्तम फायदा होतो त्याचबरोबर रोजच्या वापरात या रंगाचा वापर करून, या रंगाच्या वस्तूंचा वापर करून आपण त्या त्या रंगांची फ्रिक्वेन्सी मिळवू शकतो.

तारखां प्रमाणे त्यांचे कॉम्बिनेशन करून कपडे घालू शकतो. म्हणजे बघा हा ! एक तारीख असेल तर त्यादिवशी केशरी किंवा सोनेरी शेडचे काहीतरी घालणे. त्याला पुन्हा कॉम्बिनेशन मध्ये वाराचा रंग ऍड करू शकता. जसे की आता सप्टेंबर महिन्याची एक तारीख बुधवारी आली आहे. तर, त्यादिवशी केशरी आणि हिरव्या रंगाचे कॉम्बिनेशन करून वापरू शकता. जसे की सात तारीख मंगळवारी असेल तर त्यादिवशी लाल आणि पिके निळ्या रंगाचे एकत्र कॉम्बिनेशन करू शकता. असे दोन्ही रंगांची फ्रिक्वेन्सी मिळू शकेल.

तारीख २३ असेल तर दोन, तीन आणि त्यांची बेरीज पाच आणि वार असे कॉम्बिनेशन करता येईल. याचा अर्थ दोन चंद्र, तीन ला गुरु, पाच ला बुध म्हणजे चंद्राचे जे रंग आहेत पांढरा, क्रीम कलर आणि सिल्व्हर कलर या पैकी एक,  गुरूचा पिवळा, बुधाचा हिरवा आणि परत त्या वाराचा रंग अशा पद्धतीने कुठलाही दोन रंगाचे कॉम्बिनेशन करून तुम्ही कपडे घालू शकता. अर्थात हे जेन्ट्स ना शक्य नसले तरी महिलांना सहज करता येऊ शकते. यातला एखादा कुठलाही कलर तुम्ही वापरला तरीही चालतो.  जेन्ट्स ना काहीही शक्य नसेल तर किमान त्या रंगाचा एखादा कपडा रुमाला प्रमाणे खिशात जवळ बाळगणे.

तुमच्या मूलांक किंवा भाग्यांक जो तुम्हाला जास्त चांगला लाभतो त्या अंकाच्या रंगाचा वापर तुम्ही रोज एखाद्या गोष्टीसाठी करू शकता. म्हणजे त्या रंगाची एखादी वस्तू जवळ ठेवू शकता. जर तुमचा नंबर ९असेल तर मंगळ हा त्याचा स्वामी होईल, मग रंग असेल लाल. मग हा नंबर तुम्हाला लाभतो तर लाल रंगाचे काहीतरी – पाण्याची बॉटल, एखादा पेन, वॉलेट किंवा पाऊच, एखादा दुपट्टा वगैरे जवळ ठेवावा. त्या रंगाची फ्रिक्वेन्सी आपल्या शरीराला जास्त गरजेची असते. ती त्यातून मिळत जाते.

आता बघू या, प्रत्येक रंगाची फ्रिक्वेन्सी आपल्या शरीरावर साधारणपणे काय काम करते ?

१ – रवी –

केशरी रंग – या रंगाची फ्रिक्वेन्सी आपल्याला आनंदी ठेवते. आत्मविश्वास वाढवते. पोटाच्या विकारांवर फायदेशीर आहे. ज्यांना नेहमी सतत पोटाचे विकार होतात त्यांनी या रंगाचा वापर करावा. म्हणजे शक्यतो या रंगाचे कपडे वापरावेत. कौटुंबिक समस्या आहेत म्हणजे फॅमिली मध्ये सतत काही ना काही प्रॉब्लेम्स असतात घरातले वातावरण सतत बिघडलेले असते अशांनी सुद्धा या रंगाचा वापर जास्त करावा. हा रंग आपल्या स्वाधिष्ठान चक्र शी संबंधित आहे.

सोनेरी रंग – या रंगाची फ्रिक्वेन्सी आपल्याला प्रत्येक गोष्टीत यश मिळवण्यासाठी कामी येते. तसेच ज्यांना  हाडाचे, सांध्यांचे विकार आहेत त्यांनी हा रंग जास्त प्रमाणात वापरावा.

२ – चंद्र –

पांढरा – हा रंग शक्यतो वापरू नये. जरी पांढऱ्या रंगा मध्ये सगळ्या रंगांची फ्रिक्वेन्सी एकत्र असली तरीही त्यात कोणताच रंग उठून येत नाही. पांढरा रंग वापरल्याने माणूस विरक्ती कडे जातो. आयुष्यात कौटुंबिक सौख्य कमी होते. जोडीदाराशी दुरावा निर्माण होतो. म्हणून सांसारिक माणसाने या रंगाचे वावडे ठेवलेलेच उत्तम. म्हणजे हा रंग वापरू नये

हा ! आता…. ज्यांना संसारच करायचा नाही, ब्रह्मचर्य पालन करायचे आहे, त्यांना फक्त आध्यात्मिक क्षेत्रातच राहायचे आहे. त्यांनी मानसिक शुद्धी करण्यासाठी हा रंग वापरण्यास हरकत नाही. या रंगाचा स्वामी चंद्र मनाचा कारक आहे. त्यामुळे मनाला जशी दिशा द्यायची त्याप्रमाणे चंद्राचा तो रंग वापरा

क्रीम कलर / मोती कलर – पांढऱ्या रंगा पेक्षा या रंगाची फ्रिक्वेन्सी अजून उत्तम कारण, हा रंग पांढऱ्या रंगात चंदेरी रंग मिक्स होऊन तयार होतो. त्यामुळे हा रंग वापरायला हरकत नाही.

चंदेरी / सिल्वर कलर – हा रंग तुमचे मन शांत ठेवतो. त्यामुळे सहाजिकच इतर विचार कमी झाल्यामुळे संसारात राहूनही मनावर ताबा येतो आणि संसारात राहूनही उत्तम साधना होते. अंतरज्ञान वाढते.

३ – गुरु –

पिवळा  –  या रंगाची फ्रिक्वेन्सी उत्साह वाढवते. क्रिएटिव्हिटी वाढवते. आत्मविश्‍वास वाढून नवीन गोष्टी शिकण्याकडे कल वाढतो. पण या रंगाचा अतिरेक झाला तर अतिआत्मविश्वास (ओव्हर कॉन्फिडन्स) वाढून अहंकार वाढतो. त्यामुळे अतिशयोक्ती नको. हा रंग आपल्या मणिपूर चक्राशी संबंधित आहे.

४ – हर्षल –

चित्रविचित्र किंवा मिस्मॅच कलर – यामध्ये तुम्ही कोणतेही कॉन्ट्रास्ट कलर एकत्र वापरू शकता. त्या त्या रंगाप्रमाणे त्याचा इफेक्ट होतो.

५ –  बुध – 

हिरवा –  या रंगाची फ्रिक्वेन्सी रक्तशुद्धीकरण करते. इमोशनल ब्लॉकेजेस कमी करते. म्हणजे ज्यांना मनात सतत भावनिक कल्लोळ असतो, सतत भावनिक गुंता असतो, त्यांच्यासाठी फायदेशीर. ज्यांना झोपेची समस्या आहे म्हणजे शांत झोप लागत नाही किंवा निद्रानाश आहे अशांनी हा रंग जरूर वापरावा. हृदय रोग असणाऱ्यांनी तर याचा जास्तीत जास्त वापर करावा. हा रंग हृदय चक्राशी संबंधित आहे.

६ – शुक्र –

गुलाबी – ज्यांच्या आयुष्यात प्रेमाची कमतरता आहे किंवा जी तरुण मुले मुली विवाह योग्य आहेत परंतु तरीही विवाहात अडचणी येत आहेत, अशांनी हा रंग वापरावा. या रंगाची फ्रिक्वेन्सी प्रेमभावना निर्माण करते, वाढवते, आशावादी ठेवते. हा रंग हृदय चक्राशी संबंधित आहे.

७ – नेपचून –

फिका निळा / आकाशी – या रंगाची फ्रिक्वेन्सी आपल्या शरीरातील थकवा कमी करते.  आपले संभाषण कौशल्य वाढवते. ज्यांचा संबंध वक्तृत्व कलेशी येतो अशांनी हा रंग वापरावा. नेपच्यून अंतर्मनाचा कारक त्यामुळे तो तुमच्या अंतर्मनाची ताकद वाढवेल. अंतर्मन जागृत होऊन बोलताना किंवा भाषण करताना, एखादे लेक्चर देताना, तुमची छाप समोरच्यावर पडते. समोरच्या सगळ्या व्यक्ती खिळून राहतात. तुम्हाला ऐकताना त्यांना उठायची इच्छा होणार नाही. सतत तुम्हाला ऐकायला त्यांना आवडेल. हा रंग विशुद्ध चक्राशी संबंधित आहे.

८ – शनि –

जांभळा – या रंगाची फ्रिक्वेन्सी आपले अंतरज्ञान वाढवते. अध्यात्मात गती देते. शांत झोप लागते. त्यामुळे ज्यांना निद्रानाशाचा त्रास आहे, ज्यांना अध्यात्माकडे कल आहे, अशांनी या रंगाचा वापर करावा. हा रंग सहस्राधार चक्राशी संबंधित आहे.

निळा – या रंगाची फ्रिक्वेन्सी आपले शारीरिक आणि मानसिक तणाव दोन्ही कमी करण्यास मदत करते. मन शांत ठेवते. त्यामुळे ज्यांना सतत विचार येत असतात, त्यांनी या रंगाचा वापर करावा. म्हणजे मन शांत होईल आणि पॉझिटिव्ह विचार वाढतील. हा रंग आज्ञाचक्राशी संबंधित आहे.

काळा – या रंगाची फ्रिक्वेन्सी निगेटिव्ह, वाईट गोष्टींच्या निर्मूलनाचे कार्य करते. त्यामुळे कधीतरी वापरायला हरकत नाही. परंतु सारखा वापरू नये. जे लोक जास्त प्रमाणात काळ्या  रंगाचे कपडे घालतात त्याच्यात बरीच निगेटिव्ह एनर्जी असते. आज काल बरीच तरुण मुले काळ्या रंगाचे कपडे जास्त घालतात, त्याच बरोबर केस आणि दाढी  वाढवलेली असते. अशा मुलांना बघा त्यांचे विचार बरेच निगेटिव्ह असतात आणि प्रगती म्हणावी तशी होत नाही. म्हणून काळे कपडे कमी प्रमाणात वापरावेत.

ज्यांना निगेटिव्हिटी चा त्रास होतो अशांनी  डाव्या पायाच्या तळपायाला काजळाचा टीका लावा म्हणजे त्रास होणार नाही.

 ग्रे –  या रंगाची फ्रिक्वेन्सी स्थिरता देते. त्यामुळे ज्यांच्या आयुष्यात अजिबात कसले स्थैर्य नाही त्यांनी हा रंग वापरायला हरकत नाही.

९ – मंगळ –

लाल – या रंगाची फ्रिक्वेन्सी फायनान्शिअल ब्लॉकेजेस काढते. त्यामुळे ज्यांना पैशाशी संबंधित खूप अडचणी आहेत, कोणीही पैसे घेतले तर परत देत नाही, भिडस्तपणा मुळे मागू शकत नाही किंवा कर्ज खूप झाले आहे अशांनी या रंगाचा वापर जरूर करावा.  पण त्याचा अतिरेक नको. कारण लाल रंग आहे तो, मग तो त्याचा भडकपणा नक्कीच दाखवेल. उष्णता वाढेल आणि चिडचिड, राग राग होऊ शकते. म्हणून जरा जपूनच. मर्यादित वापर करा.

इनर वेअर शक्यतो लाल रंगाचे वापरा कारण हा रंग मूलाधार चक्राचा आहे. त्यामुळे आपले मूलाधार चक्र ऍक्टिव्ह  होते. लाल, चॉकलेटी असा लाल शी संबंधित कोणताही शेड चालेल. त्यामुळे आर्थिक अडचणी आपोआप दूर होऊ लागतात.

कोणत्याही रंगाचा अतिरेक करू नका कारण त्या रंगाची फ्रिक्वेन्सी जर खूप जास्त प्रमाणात झाली तर त्याचे साईड इफेक्ट होऊ शकतात. जसे की फळ किंवा ड्रायफ्रूट खाणे आपल्या आरोग्यासाठी चांगले असते. पण म्हणून आपण फक्त तेच खात नाही. आपण जेवण ही करतो व्यवस्थित. म्हणजेच सगळे पदार्थ प्रमाणात खातो. अगदी तसेच सरसकट सगळे रंग कमी-जास्त प्रमाणात वापरावेत.

आपल्या कुंडलीत पत्रिकेत तसे सगळेच ग्रह असतात. त्यांचा असर आपल्यावर आपल्या आयुष्यावर होत असतो. काही ग्रह शुभ ग्रह असतात तर काही ग्रह हे  पापग्रह असतात. परंतु, प्रत्येकाच्याच पत्रिकेत सगळे शुभ ग्रह शुभ फळे देत नाहीत आणि पापग्रह पाप किंवा अशुभ फळे देत नाहीत. तर त्या त्या लग्नानुसार त्याच्या कुंडलीतील ग्रह शुभ किंवा अशुभ ठरतात. तरीही आपल्या आयुष्यात प्रत्येक ग्रहाचा रोल महत्त्वाचा असतो.

जेवताना नुसतेच गोड असेल तर जेवण जाणार नाही आणि नुसतेच तिखटही नको वाटेल. त्यामुळे कधी गोड तर कधी तिखट दोन्हीही पाहिजेच. तसेच आयुष्यात नुसता आनंद असून चालणार नाही किंवा नुसते सुख असून चालणार नाही. त्या सुखाची किंमत कळण्यासाठी बरोबरीने थोडेफार दुःखही असावे, तर त्या सुखाची किंमत कळेल. त्या आनंदाची किंमत कळेल.

तसेच आपल्यासाठी जरी आपला भाग्यांक, मूलांक महत्त्वाचे असले तरी त्याच बरोबर इतर ग्रहांचा रोलही आपल्या आयुष्यात महत्त्वाचा असतो. जसे जेवणात अनेक पदार्थ असतात पण अमूकच पदार्थ आवडतो, म्हणून आपण रोज तेच खात नाही. तर ताटात भाजी, चपाती / भाकरी, डाळ, भात, लोणचे, कोशिंबीर, काहीतरी गोड, कधीतरी भजी, पापड असं सगळं असतं ना ? त्यालाच पूर्ण जेवण म्हणतो आपण. ते सगळेच गरजेचे असत ना ?

तसेच आपल्यासाठी सगळ्याच अंकांची फ्रिक्वेन्सी गरजेची असते. म्हणून सगळ्या अंकांची फ्रिक्वेन्सी आपल्या आयुष्यात हवी असेल तर सगळे रंग वापरा आणि आयुष्य आनंदी करा. कारण जर एखाद्या अंकाची फ्रिक्वेन्सी कमी झाली तर त्या रंगाची फ्रिक्वेन्सी कमी होते आणि त्या रंगाशी संबंधित असलेले चक्र असंतुलित होते. मग त्या संबंधित अडचणी वारंवार आयुष्यात येतात आणि मग आपण म्हणतो की मी इतकं सगळं देवाधर्माचं करतो, सचोटीने काम करतो, तरीही यश नाही मिळत.कसे मिळेल त्या नंबरची फ्रिक्वेन्सी कमी पडली ना !

एक उदाहरण देते बघा हं !

जर का तुम्हाला एखाद्या व्यक्तीला फोन करायचा आहे तर तुम्ही त्या व्यक्तीच्याच मोबाईल नंबर वर लावणार ना ? तो जर नंबर चुकला तर त्या व्यक्तीला कॉल जाईल का ? नाही ना ? तो बरोबर नंबरच लावावा लागेल. तरच त्या व्यक्तीशी संपर्क होईल. म्हणजे काय तर त्या नंबरची  आणि तुमच्या नंबर ची फ्रीक्वेंसी जुळली असे म्हणू या.

खरे तर हे कलियुग आहे हे चालतेच मुळी फ्रिक्वेन्सी वर. म्हणून तर कुठलेही कनेक्शन नसताना आपण मोबाईलवर हर प्रकारे एकमेकांशी बोलू शकतो, लॅपटॉपवर काम करू शकतो. इंटरनेट वापरू शकतो. इतकेच काय तर साधनेसाठी ही रेकीची (वैश्विक प्राणशक्तीची) ऊर्जा फ्रिक्वेन्सी शोषून घेऊ शकतो.

अजून किती उदाहरणे देऊ जे फक्त आणि फक्त फ्रिक्वेन्सी आहे, आपले शरीर सुद्धा, म्हणून तर मोबाईल मध्ये काढलेला फोटो मोठा करत जा काय होईल ? तो ब्लर दिसू लागेल. का ? कारण, तिथेही फ्रिक्वेन्सीच आहे. म्हणून ह्या नंबरच्या फ्रिक्वेन्सी वाढवण्यासाठी रंगांच्या फ्रिक्वेन्सी चा वापर करा. आपण या गोष्टी रोजच्या जीवनात सहजासहजी करू शकतो. त्यामुळे त्या करणे सहज सोपे आहे तर त्याचा वापर करून  तरी बघा. आणि त्यानंतर तुम्हाला काय अनुभव आला मला सांगायला विसरू नका. तर कशी वाटली ही अंकांची आणि रंगांची दुनिया ? हे मला जरूर कळवा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *