सफर मनाची………

सफर मनाची………

सफर मनाची………

 नाव वाचूनच गंमत वाटली ना ?  केलीये का हो कधी मनाची सफर ? नाही ना ? मग येणार का माझ्या बरोबर या सफरीला ?

…………      काय म्हणालात ?     ……….

नाही नाही ! काही तयारी करायची गरज नाही. मी आहे ना……… थांबा !  सांगते….. सगळे सांगते. कसे जायचे, काय करायचे, तयारी या साठी नको की, कशाला ओझे वाहायचे ?

आधीच रोजच काम, व्याप, घर, ऑफिस, मुलं, त्यांचा अभ्यास , शाळा, क्लासेस , टेन्शन या सगळ्याचे ओझे काय कमी आहे का ? म्हणून अजून ओझे घेऊन जायचे.

मनात तर असंख्य विचार. सगळेच. कशाचे हे  सांगणे अवघड. कामाचे, कोण काही बोलेल,बोललय याचे, वाईट घटनांचे, दुखःद  घटनांचे, नको असलेल्या सगळ्या गोष्टींचे,………….. 

अजून किती लिस्ट करू, कमीच आहे…..!

रोज तुमच्या पैकी बरेच जण मॉर्निंग  वॉकला जाता . जाता ना ? हा……..! 

तर सकाळी सकाळी फिरायला गेल्यावर कसे मस्त वाटते ना. शनिवार – रविवार ला लागून सुट्ट्या आल्या किंवा उन्हाळ्याची सुट्टी, दिवाळीची सुट्टी आली, ही तर मोठी सुट्टी,  की मग तर मोठी सहल झालीच पाहिजे.

सगळ्या ताणताणाव, कामाचे ओझे या  सगळ्यापासून लांब राहण्यासाठी किंवा यातून बाहेर पडण्यासाठी  सुट्टी मिळताच आपण कुठेतरी बाहेर फिरून येतो. ट्रीप ला जातो.  

पण या सगळ्यात आपण एक विसरत आहोत की, हे सगळे करून ही आपण या ताणतणावातून बाहेर पडतोच का ? मनाला शांती मिळतेच का ? मनातली विचारांची वादळ शमतात का ? नाही ना ?                    

पण हो खरच मी तुम्हाला मनाची सफर करून आणणार आहे. खूप मस्त आणि आनंद दायी प्रवास आहे हा. हा प्रवास केल्यानंतर तुमची मानसिक शक्ती तर वाढणारच आहे पण आत्मविश्वासही वाढेल.

म्हणूनच मी सुचवेल की, या सुट्टीत आपण सगळेच मनाची सफर करून येऊ. तसे पण या कोरोना मुळे ही सुट्टी जरा जास्तच लांबली ना. चला तर मग येताय ना, मनाची सफर करायला ?  

तिथे जाणं सोप्प आहे अगदी त्यासाठी कोणताही खर्च नाही. हा पण या सफरीमध्ये तुम्हाला काहीतरी मिळेल हे नक्की…………….!                                                                                    

रम्य ते बालपण

 थांबा ! थांबा !! घाई नका करू, जाणारच आहोत आपण , पण ……… त्या आधी आपल्या आयुष्याचा थोडासा आढावा घेऊ या…….!

आठवते का आपले बालपण किती सुखाचे होते. खूप खेळायचो, मजा करायचो. थोड्याफार फरकाने असेल ही पण साम्य नक्कीच आहे. आहे ना !  अजूनही ते दिवस आठवतात आणि मग पुन्हा भूतकाळात जावसं वाटत. मन तिथेच रमत. अशा वेळी परत यावेसे वाटत नाही. किती बर झाल असत ना , जर का असं आयुष्याच्या कोणत्याही काळात सहज जाता आलं असत तर. हो ना ! तुम्हालाही असेच वाटते ना. 

‘ रम्य ते बालपणकिंवालहानपण देगा देवा ’ असे अजूनही म्हणावेसे वाटते. कारण खरचं आमच बालपण होतेही तसेच. आम्ही कधीही टिव्ही समोर किंवा मोबाईल घेऊन बसलेलं आठवत नाही. मुळात आमच्या लहानपणी मोबाईल नव्हतेच आणि टिव्ही म्हणाल तर कॉलनीत एखाद दोघांकडे. मी पाचवीत होते तेव्हा आमच्याकडे टिव्ही आला पण त्यावर कार्यक्रमाच्या मोजक्याच वेळा ठरलेल्या असायच्या.  त्यामुळे असेल कदाचित किंवा खेळाची आवड होती म्हणून असेल आम्ही कधी टिव्ही मध्ये रमलो  नाही.

वार्षिक परीक्षे नंतरची उन्हाळी सुट्टी म्हणजे तर आनंदाचे दिवस. सकाळी आसनं करण, सूर्यनमस्कार घालणे, दोरीवरच्या उड्या मारणे, शनिवार वाड्यावर फिरायला जाणे, तिथे बकुळीचे मोठे झाड होते. आता आहे की नाही माहीत नाही.  त्याची फुले गोळा करून आणणे आणि मग घरी आल्यावर त्याचा गजरा करून दिवसभर येवढ्याशा केसात माळून मिरवणे.

उन्हाच्या वेळी दुपारभर बैठे खेळ खेळणे – सागरगोटे, बिट्ट्या, पत्ते, कॅरम, काच कवड्या आणि बरेच काही. संध्याकाळी ऊन ओसरले की मग मैदानी खेळ, शिवणापाणी, सुई दोरा, विष अमृत, रन-राऊंड, आर्यभट्ट, रॅकेट, रिंग, लगोरी असे खूप खेळ खेळायचो आम्ही. कदाचित आत्ताच्या मुलांना हे खेळ माहीत ही नसतील.

‘रम्य ते बालपण’ खरचं खूप सुखी होतो आम्ही लहानपणी, म्हणजे माझ्या वयाचे सगळेच आत्ताचे पालक. ज्यांनी नुकतीच चाळीशी ओलांडली ते आणि त्या आधीचे ही.

काय झाले …….?  आठवले ना ते दिवस ………?  गेल्या ना त्या आठवणी डोळ्यासमोरून …….?  भरून आले ना क्षणभर ……?

होय…..!  आपण हे सगळे आनंद उपभोगले कारण त्यावेळी जास्तीत जास्त एकत्र कुटुंब पद्धती होती. त्यामुळे सगळ्यांचेच लक्ष असायचे आपल्यावर. सगळी सख्खी चुलत भावंड एकत्र असायचो. काय मजा मस्ती करायचो. रोज संध्याकाळी शुभंकरोती, मनाचे श्लोक, रामरक्षा, मारुती स्तोत्र आणि गणपती अथर्वशीर्ष म्हंटल्या शिवाय सुटका नसायची. शाळा असो, सुट्टी असो, रोज सकाळी पाढे म्हणणे, आणि दोरीच्या उड्या हे  सुद्धा करावच  लागायचं. 

प्रत्येकाच्या आयुष्यात थोड्याफार फरकाने असेच घडले असणार.    

खरंच यार !  ‘गेले ते दिन गेले , राहिल्या  त्या आठवणी’  असेच म्हणायचे आणि देवाला पुन्हा म्हणायचे – ‘लहानपण देगा देवा’ असो ….. इथेच रमले तर लेख पुढे सरकणार नाही.   

सध्य परिस्थिती

 झाले का बालपणाच्या आठवणीत रमून ……?  झालात ना थोडे  फ्रेश …….?  मस्त वाटतय ना ……..?

आता थोड आपल्या मुलांकडे वळू या. ज्यांची मुले आता बऱ्या पैकी मोठी झाली आहेत त्यांनी आठवा , त्याचं बालपण कसे गेले किंवा ज्यांची मुल अजूनही  लहान आहेत त्याचं काय चालू आहे बघा.

कारण आता आपण रहातोय ते विभक्त कुटुंबात. अर्थात त्याला ही काही रास्त कारण आहेत, हे  नाकारून नाही चालणार.  आत्ताच्या काही कारणांमुळे झालेल्या विभक्त कुटुंब पद्धतीचा मुलांवर मात्र चांगलाच परिणाम होतो आहे. आई वडील दोघेही नोकरी निमित्त घराबाहेर त्यात मुले घरात एकटी, हातात मोबाईल आणि समोर ते स्टूपीड बॉक्स……… सॉरी हं ! टिव्ही.  

हा आता काही कार्यक्रमातून मिळते थोडीफार माहिती पण बाकी सगळे करमणूकीच्या ही पलिकडले जग. मग मुलांची काय अवस्था होईल. त्यात आता खेळायला मैदाने नाहीत, जास्तीतजास्त वेळ शाळा आणि वेगवेगळे क्लासेस यातच जातो, त्यात  घरी आल्यावर घरात कोणी नाही,  मुले एकटी पडत आहेत. 

एकलकोंडी होत आहेत. त्याचा परिणाम एकूणचं मुलांच्या प्रकृतीवर, मानसिक स्वास्थ्यावर आणि स्मरणशक्तीवर, एकाग्रतेवर होताना दिसतो आहे.

मोठ्यांची म्हणजे आई बाबांची किंवा आपली अवस्था ही काही फार वेगळी आहे असे नाही. १० ते १२ तास कामाच्या निमित्ताने बाहेर राहावे लागते. पुन्हा आल्यावर घरच्या जबाबदाऱ्या, सगळे निस्तरे पर्यंत नाकी नऊ येतात. 

त्यात आजकाल कामावर अति स्पर्धा, वेळेच्या आत टार्गेट्स पूर्ण करणे, ऑफिसमध्ये थोडा जरी परफॉर्मन्स कमी झाला तर नोकरी जाण्याची भिती. एक ना अनेक गोष्टींचे दडपण असते मनावर आणि हे तणावाचे भूत मानेवर घेऊनच जगत असतो आपण.

यातूनच तर बाहेर पडायचे आहे आपल्याला. फक्त आपल्याला नाही तर मुलानाही यातून बाहेर काढायचे आहे. हा ! आता ही परिस्थिती तर काही आपण बदलू शकत नाही.  पण त्यावर मात त्रि करू शकतो.  या साठीच आपण करणार आहोत, सफर मनाची.

चला तर मग करा तयारी मनाची, उद्याच निघतोय आपण सफरीला.

सफरीची तयारी

चला तर मग करू या सफर मनाची………!

हा आता या साठी जर काही तयारी करायची असेल तर ती म्हणजे मनापासून रोजचा ठराविक वेळ या सफरी साठी देणे. पहाटे, रात्री किंवा दुपारी अशी एक निवांत वेळ निवडायची, फार नाही सुरुवातीला २० मिनिटे खूप झाली. त्यावेळी फोन, टिव्ही सगळे बंद ठेवायचे. एका जागेवर निवांत बसायचे. 

ज्या जागी बसल्यानंतर तुम्हाला छान वाटते  किंवा आपली एक अशी जागा असते जिथे बसले की का काय माहित पण रिलॅक्स वाटते, ती जागा निवडा. सहजासनातच बसाव, म्हणजे साधी मांडी घालून ताठ बसावे. हाताची ध्यान मुद्रा किंवा ज्ञानमुद्रा करावी.                                       

ध्यान मुद्रा – दोन्ही हाताची बोटे एकमेकात गुंतवून अंगठ्यांची टोके एकमेकाला चिटकवणे आणि हात बेंबीजवळ ठेवणे.                                                                                      

ज्ञान मुद्रा – अंगठा आणि अंगठ्या शेजारील बोट (तर्जनी) एकमेकांना जोडून बाकी तीन बोटे मोकळी सरळ ठेवावीत. दोन्ही हात याच अवस्थेत गुडघ्यावर सुलटे ठेवावेत.

डोळे बंद करावेत. एक दीर्घ श्वास घेऊन हळूहळू श्वास सोडत स्वस्थ व्हावे. शांत बसून राहावे. आता तुम्ही म्हणाल की , ‘असे शांत बसल्यावर असंख्य विचार येतात मनात.’ हो…….! 

येऊ देत की मग त्यांनाच तर आपल्याला बाहेर हाकलून लावायचे आहे. मन स्वच्छ करायचे आहे.

आता तुम्ही म्हणाल ‘म्हणजे काय ? असे शांत बसून कुठे मन स्वच्छ होते का ? तर हो, होते. बघा हं….! 

समजा तुमचे मन म्हणजे एक खोली आहे. त्यात असंख्य विचारांचा, आपल्या आयुष्यात घडलेल्या वाईट घटनांचा, दु:खाचा असा सगळा कचरा पसारा भरला आहे. 

अशा वेळी तुम्हाला जर म्हंटले की त्या खोलीत बसा तर तुम्ही बसू शकाल का ? 

नाही ना ? 

तुम्ही म्हणाल इथे किती घाण आहे कसे बसणार ? ती खोली साफ केल्या शिवाय तिथे मी बसू शकणार नाही.’ अगदी बरोबर, आता सांगा तुमच्या मनात सुद्धा वर सांगितल्या प्रमाणे सगळी घाण (होय – नकारात्मक विचार, दु:खद घटना, वाईट घटना, टेन्शन या सगळ्याला आपण घाणच म्हणू या ना) मनात घेऊन सतत सोबत घेऊन तुम्हाला शांत कसे बसता येईल ? 

त्यासाठी मनाची खोली नको का साफ करायला  ?   

तेच तर काम करायचे आहे आपल्याला या सफरी दरम्यान म्हणजे मग तुमचे मन एकदम शांत होईल. आणि कितीही वेळ निवांत बसलात तरी एकही विचार मनात येणार नाही, तुम्हाला एकदम हलके वाटेल. वाटणारच ना. मनावरचे विचारांचे भूत, ताणतणावाची जाळ्या जळमटे सगळीच तर आपण काढून टाकणार आहोत. 

मनाची सफाई

बरं………….! आता हे करायचे कसे ते पाहू तुम्ही शांतपणे सहजासनात हाताची ध्यानमुद्रा किंवा ज्ञानमुद्रा करून बसा. डोळे बंद करा.  दीर्घ श्वास घेऊन हळू हळू श्वास सोडत स्वस्थ व्हा. आणि शांत बसा.  आता मनात एक – एक विचार येऊ लागतील – येऊ देत. 

पण त्यावर आता विचार करत बसू नका तर आलेले विचार फक्त मोजा आणि त्यांना बाहेर जाऊ द्या. म्हणजे आता एखादा विचार आला  तर त्याला एक नंबर द्यायचा, जा म्हणून सांगायचे.  त्याकडे दुर्लक्ष करायचे मग लगेच दुसरा विचार येईल पुन्हा तेच करायचे त्याला दोन नंबर द्यायचा. असे जितके विचार येतील प्रत्येकाला बाहेर काढायचे आणि पुढचा नंबर द्यायचा. बस येवढेच करायचे.

पहिल्या दिवशी कदाचित खूप विचार येतील आपण समजूया की, पहिल्या दिवशी १०० विचार आले. तर दुसऱ्या दिवशी ९० च येतील तिसऱ्या दिवशी ८० येतील चौथ्या दिवशी ७० येतील. 

असे करत करत मनातले सगळे विचार घटना सगळे बाहेर निघून जातील आणि एक वेळ अशी येईल की मनात एक ही विचार येणार नाही म्हणजे एकदम शांती, निर्विचार अवस्था. मन एकदम शांत होऊन जाईल. पण हो ! त्यासाठी चिकाटी पाहिजे. कंटाळून चालणार नाही हं !  रोज न चुकता मनात फेरी मारावी लागेल.आजीबात एक दवस ही गॅप पडू द्यायची नाही.  

आता नेमकं कस ते थोडं समजून सांगते हं ! आपण काल बघितले की त्या खोलीत खूप घाण आहे तर तिथे बसणे शक्य नाही आणि एका दिवसात सगळी खोली साफ करणेही शक्य नाही. मग आपण काय करणार तर, पहिल्या दिवशी फक्त खोलीत उभे राहण्याइतकीच जागा साफ करू. उद्या बसण्यापुरती जागा साफ करू. परवा आणखी थोडी जागा साफ करू. असे रोज थोडे थोडे साफ सफाई झाल्यावर एक दिवस असा येईल की संपूर्ण खोली लख्ख स्वच्छ झालेली असेल. मग त्या खोलीत बसायला प्रसन्न वाटेल की नाही ?

तसेच आपल्या मनाचे आहे. मन स्वच्छ झाले की तिथे बसायला एकदम प्रसन्न वाटायला लागते. मग चिडचिड, राग, अप्रसन्नता, टेन्शन हे सगळेच आपल्याला सोडून जायला लागतील. आणि शांती, प्रसन्नता, प्रेम आणि ताजेतवाने पण हे आपले चांगले जवळचे मित्र व्हायला लागतात. हे करणे म्हणजे तुमच्या मनाचा फॉर्मेट मारणे होय.

तुम्ही मोबाईल वापरता कि नाही त्यामुळे मेमरी फुल झाली म्हणजे डाटा जास्त झाला, कि तुम्ही काय करता ? तो डिलीट करता ना ? आणि जास्तच झाले, मोबाईल हँग व्हायला लागला, कि तो मोबाईल फॉर्मेट  मारता, हो  ना ?हो अगदी तसेच आपले मन म्हणजे मेमरी कार्ड आहे. 

त्यातल्या  अनावश्यक मेमरी डीलिट नको का करायला आणि आपण हँग झालो म्हणजे चिडचिड, राग राग वाढला, डिप्रेशन आले कि मग मनाचा फॉर्मेट पण मारलं पाहिजे कि नाही ?

हा फॉर्मेट मारताना किंवा मेमरी डिलीट करताना आपल्याला कळते कि आपण किती कचरा मानता साठवला आहे आणि ती कचराकुंडी सोबत घेऊनच आपण सगळीकडे फिरत आहोत. त्यामुळे मनावर ओझे तर वाटणारच ना आणि ही  निगेटीव्हीटी सोबत घेऊन फिरल्यामुळे त्याचा वास सगळीकडे पसरतोच. 

म्हणजे या नकारात्मक विचारांचे एक वलय आपल्या भोवती निर्माण होते त्यामुळे आपल्या आजूबाजूच्या व्यक्ती आपल्या पासून लांब जाऊ लागतात. आपण सगळ्यांनाच नकोसे वाटायला लागतो. आपलीच माणसे आपल्यापासून दूर जातात. आपल्याला टाळायला लागतात.

मग असे झाले तर चालेल का तुम्हाला ? नाही ना ? मग पटतंय ना की, मनाचा फॉर्मेट मारायला पाहिजे. अनावश्यक गोष्टी डीलिट केल्या पाहिजेत. आणि हे करण अगदी सोप्पं आहे. अवघड काहीच नाही. फक्त रोज थोडा वेळ काढायचा आहे. सवयीने ते ही आपोआप जामायला लागेल.

 आता तुम्ही म्हणाल मन शांत झाल्यावर पुढे काय ?                                   

   कल्पवृक्ष

पुढे तर आहेच ना………! 

आता जसा मोबाईल रिकामा झाला की एखादे नवीन अॅप डाऊनलोड करता की नाही ? तसेच मनाचे पण एक अॅप डाऊनलोड करायचे. त्याचे नाव ‘स्वयं सूचना’. आता या  अॅपचा वापर फक्त स्वतःला सकारात्मक सुचना देण्यासाठी करा. आपले अंतर्मन हे खूप शक्तीशाली आहे. त्याला तुम्ही ज्या काही सूचना द्याल त्या ते सत्यात आणण्याचा प्रयत्न करते. 

अगदी अशक्यही  शक्य करण्याइतकी ताकद आपल्या मनाची असते. तिथे आपण जो विचार पेरू तो उगवतो. म्हणजे सत्यात येतो मग तो नकारात्मक असो किंवा सकारात्मक. मग का नको आपण फक्त सकारात्मक विचार करायला ? आणि आकर्षणाच्या  नियमानुसार त्याला सत्यात उतरवायला ?  

हा  आकार्षणाचा नियम ( Law of attraction ) म्हणजे तुम्ही जे मागाल ते मिळवून देतो.  जणू एखादा कल्पवृक्ष. मग त्या साठी काय करायचे तर आधी स्वतःला काय हवे आहे ते ठरवायचे.  म्हणजे पुढील एक वर्षात मला हे हवे आहे, हे करायचे आहे,  हे तुम्ही ठरवायचे. ते एका वहीत लिहून ठेवायचे अगदी तुम्ही तारखाही टाकू शकता बर का ! की अमुक तारखेच्या आत मला ही गोष्ट, ही वस्तु हवी आहे. मग ते काहीही असेल. 

तुमचे प्रमोशन असेल, एखादी गाडी घेणे असेल, वस्तू घेणे असेल किंवा तुमच्या व्यवसायातले तुमचे टार्गेट असेल, काहीही असू शकते अगदी तुम्ही तुमचे लग्न झाले नसेल तर तुमची इच्छा तुमचा जोडीदार मिळणे ही सुद्धा असू शकते.  ते सगळे लिहून ठेवायचे .

बर आता इथेच नाही हा थांबायचे !  आता जी  गोष्ट हवी आहे ती मिळाली आहे अशा अविर्भावातच जगायचे, तीच स्वप्न बघायची .तुमची  इच्छा पूर्ण झाली आहे अशी कल्पना करायची म्हणजे समजा तुम्हाला प्रमोशन हवे किंवा एखादी बिजनेस डील क्रॅक केल्यामुळे तुम्हाला मिळणारा नफा मोठा हवा आहे . 

अशावेळी तुम्ही त्या रकमेचा चेक हातात आला आहे किंवा ती रक्कम तुमच्या  बँकेच्या खात्यात जमा झाली आहे अशी रोज झोपताना कल्पना करा.थोडक्यात काय तर उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघा. मग बघा काय जादू होते . हा आकर्षणाचा नियम खूप भारी आहे . फक्त तो वापरता आला पाहिजे. म्हणजेच तुमच्या कडे असलेल्या कल्पवृक्षाला ओळखता आले पाहिजे. त्याचा योग्य वापर करता आला पाहिजे.

जर एखादी व्यक्ती आपल्या जोडीदाराच्या शोधात आहे तर त्या व्यक्तीने आपला जोडीदार आपल्याला मिळाला आहे असे समजून आपल्या कपाटात त्याच्या कपड्यांसाठी जागा ठेवणे,  झोपतांना बेडवर शेजारची जागा जोडीदाराची आहे असे समजून झोपले तर, मग लवकरच तुमचा जोडीदार तुमच्या आयुष्यात येईल  .

ज्यांना कार घ्यायची आहे त्यांनी तसे लिहून ठेवल्या नंतर म्हणजे, ‘या कंपनीची कार अमुक  तारखेच्या आत माझ्याकडे आलेली आहे’  असे  लिहिल्यानंतर रोज रात्री झोपताना ती कार तुम्ही स्वतः चालवत रोज कामावर जात आहात  किंवा फॅमिलीला घेऊन बाहेर फिरायला गेले आहात अशी कल्पना करा. पूर्ण चित्र बघा.  मग बघा काय एकेक चमत्कार होऊ लागतात !                                                                                                                                          

हाच प्रयोग मुलांनी करायचा म्हणजे (हे पालकांनी त्यांच्याकडून करून घ्या.) त्यांनी परीक्षेत किती मार्क मिळवायचे आहेत हे  ठरवायचे. विद्यार्थ्यांनी रोज रात्री  झोपताना असा संकल्प करा कि, “मी रोज योग्य पद्धतीने आणि मनापासून अभ्यास करत आहे, केलेला अभ्यास माझ्या छान लक्षात राहिलेला आहे, परीक्षेच्या वेळी मला सगळे व्यवस्थित आठवून मी पेपर व्यवस्थित सोडवला आहे आणि मला पैकीच्यापैकी गुण मिळालेले आहेत.”किंवा हेच एखाद्या खेळाच्या बाबतीत करिअर करायचे आहे, त्यासाठी पण अशाच पद्धतीचा संकल्प करू शकता.

मनाचा पसारा

याच बरोबर रोज डायरीत काही तरी लिहिण्याची, नोंद करायची सवय लावा . म्हणजे तुम्हाला जर काहीतरी हवे आहे तर त्यासाठी काहीतरी केले पाहिजे  आणि त्यातले तुम्ही आज काय करू शकला किंवा केले त्याची नोंद करायची, आणि उद्या काय केले पाहिजे हे  सुद्धा लिहायचे.  

या पद्धतीने जसे हवे असलेल्या  गोष्टी तुम्ही आत्मसात करू शकता तसेच नको असलेल्या गोष्टी सुद्धा तुम्ही तुमच्या पासून लांब करू शकता.  आणि हो, लिहायची सवय लागली की स्वतःशी  बोलायची सवय पण लागते बर का ! मन मोकळे होते. मग रोज एकदा तरी मनाचा फेरफटका मारल्याशिवाय रहावत नाही. आता ही सवयच करून घ्या. एक लक्षात ठेवा, तुमच्या मनात फक्त तुम्हीच फिरून येऊ शकता, दुसरे कोणीही नाही.                                                                                          

असे ध्यान  करण्याची सवय लागली ना कि, कोणीही तुमच्या मनावर राज्य करू शकत नाही, तुमच्या शिवाय !! हे  सगळे करत असताना तुम्हाला खूप वेगवेगळे अनुभव येतील, ते लिहून ठेवायला मात्र विसरू नका.

काय मग , कशी वाटतीये  मनाची सफर ? करून बघाच, कसा असीम आनंद मिळतो, कशी शांती मिळते , जी या पूर्वी कधीच अनुभवली नसेल. एकदम हलके वाटायला लागते. नवीन वाटा आपल्यासाठी खुल्या होतात. हे जग माझे आहे , मीच जिंकणार , जिंकूनच दाखवणार हा आत्मविश्वास नव्याने निर्माण होतो. कोणताही आजार असो किंवा अपयश मग तुमच्या जवळ सुद्धा फिरकणार नाही.

म्हणूनच म्हणतात ना , ‘मन चंगा तो सब चंगा.’ या सफरीचे अनुभव मला सांगायला विसरू नका हं. मी वाट बघेन. तुमचे अनुभव ऐकायला नक्की आवडेल मला.

धन्यवाद !!!                                                                          

या वरून काही ओळी सुचल्या त्या अशा…………….                

मनाची ये द्वारी उभी क्षणभरी, मनाचा पसारा पाहतसे 

किती हा विस्तार करोनी ठेविला काय सांगू तुला सुचेना मला

कसा दिसतो हा पसारा, माझेच मला उमजेना  

ठरविले आता बसावे शांत क्षणभरी 

फिरुनी यावे मनाचे अंतरी 

मारावा फेरफटका स्वतःचा एकदातरी 

दिवसांमागे दिवस जात असे मनात हे ओझे वाढत जाते 

आता मात्र पक्का केला हा निर्धार 

नाही आता थांबणार, नाही आता थांबणार 

जाणार मी आता मनाच्या गाभारी 

सफरीसाठी  मनाच्या अंतरी, मनाच्या अंतरी 

भेटेल मी पुन्हा माझीच मला नव्याने उमजेल 

मीच स्वतःला, मीच स्वतःला…!!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *