मानवी जीवनातील साधनेची गरज – Necessity of Meditation in Human Life

मानवी जीवनातील साधनेची गरज – Necessity of Meditation in Human Life

आजच्या या जगात प्रत्येकालाच साधना करायची आहे. अध्यात्म हव आहे. गुरु करायचा आहे, हा इंस्टंट चा जमाना आहे त्यामुळे ते ही सगळ इंस्टंट हवंय. आज गुरु केला दीक्षा घेतली , उद्या लगेच माझं ध्यान लागल पाहिजे, लगेच मला ज्ञान प्राप्ती झाली पाहिजे, लगेच समाधी लागली पाहिजे. अरे ! हे काय २ मिनिट नुडल्स आहेत का ? असे सगळे सहज प्राप्त होत असते तर साधकांनी जन्म च्या जन्म या साठी वाया घालवले नसते. कोणतीही साधना इतकी सोपी नसते कि, लगेच सगळे प्राप्त होईल. पण , हे सांगणार कोणाला आणि समजून घेणार तरी कोण ? सध्याची कोव्हीड ची परिस्थिती बघता हे प्रमाण जरा जास्तच वाढले आहे. बहुतेक लोकाना अध्यात्म, साधना याचे महत्व कळायला लागले आहे, पण ते कसे करायचे हे मात्र माहित नाही. त्या साठी ही जीवाची सगळी धडपड चालू आहे.

एक गुरु करायचा. त्याने काही साधना दिल्या, मंत्र दिला, तर त्याची प्रचीती यायला वेळ लागणार. पण नाही, आम्हाला दमच धरवत नाही. इथे काहीच मिळाले नाही असे म्हणून दुसरा गुरु शोधला जातो. इथेही पुन्हा तेच. मग तिसरा……..  मग चौथा गुरु……… या सगळ्यात वाया जातो तो फक्त वेळ, पैसा आणि आयुष्य, आणि हातात येतो तो फक्त मनस्ताप. 

साधना करायची असेल तर सगळ्यात आधी विश्वास हवा, मग  त्या गुरुवर असलेली श्रद्धा आणि गुरूंनी सांगितलं ते प्रमाण मानून, त्यांना संपूर्ण नतमस्तक होऊन शरण जाऊन त्यांनी सांगितलेले साधना करायची तयारी हवी. मग त्यासाठी कितीही दिवस, महिने किंवा वर्ष घासावी लागली तरी चालतील, पण तरीही मिळेल हा दृढ विश्वास हवा. गुरु आपल्या कडून सगळे करवून घेतात. आपल्याला तावून, सुलाखून बाहेर काढतात, हिऱ्याचे रूप देतात. असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

साधना मार्गात वेळ देण्याची आणि साधना मनापासून करण्याची तयारी हवी. चुकुनही अविश्वास येता कामा नये. तर आणि तरच अनुभव आणि अनुभूती आल्यावाचून रहाणार नाही. त्यासाठी थोडा वेळ जावा लागेल.

एक उदाहरण बघू या. समजा एखाद घर खूप घाण आहे आणि तुम्ही तिथे गेलात. तुम्हाला लगेच दिवा धूप लावा असे सांगितले. तर तुम्ही म्हणाल कसे शक्य आहे ? हो ना ?  मग आपलीही तीच अवस्था आहे. आपल्या शरीराला, आत्म्याला, मनाला कित्येक कर्मांनी घाण केले आहे, मलीन केले आहे. हे कित्येक जन्मांपासुनचे असू शकते. मग ही घाण साफ नको का करायला ? जसे तुम्ही आधी ते संपूर्ण घर स्वच्छ कराल. सगळा पसारा आवरून घ्याल. नको असलेल्या वस्तू, भंगार, काढून टाकाल. सगळी जाळ्या, जळमट, धूळ साफ कराल. भांडी घासून लक्ख कराल. सगळे घर स्वच्छ पुसून घ्याल. त्यानंतर आंघोळ करून शुचिर्भूत होऊन मग देवघर साफ कराल. देव धुवून पूजा करून मग शेवटी दिवा लावून धूप दाखवाल ना. तेव्हा घरातले वातावरण पूर्ण पणे बदलून जाईल. हो ना ?

आता एक करा. फ्लॅश बॅक मध्ये जा आणि बघा घरात पाय ठेवला तेव्हा कसे वाटले होते. किती चिडचिड झाली होती. त्या नंतर एक एक रूम एक एक कोपरा साफ करेपर्यंत किती तास गेले,   कदाचित काही दिवस आणि कंबरडे किती मोडले, किती घाण बाहेर काढली ?  त्यानंतर हे असे सुंदर आणि प्रसन्न घर मिळाले. मग आता हाच विचार तुम्ही तुमच्या स्वतःच्या बाबतीत करा बरं ! अशीच विचारांची, आठवणींची अडगळ आपण आपल्या मनात जमा करून ठेवली आहे मग ती कोणत्याही जन्मातली असू शकते नको असलेल्या वाईट घटना, वाईट विचार, त्रासदायक व्यक्तींचे चेहरे सगळेच आपण जमा करून ठेवलेले असते शरीरात, अनेक सूक्ष्मातिसूक्ष्म पेशींमध्ये, मनामध्ये, एवढेच नाही तर राग, द्वेष, इर्षा, जलन, मोहमाया सगळेच जमा करून ठेवलेले असते कित्येक जन्मांचे.

आता तुम्ही म्हणाल, ‘हे कसे शक्य आहे ?’ तर हे शक्य आहे. कसे ते सांगते एखादी व्यक्ती कधीतरी आपल्याला कुठेतरी भेटते आणि ओळख होते तेव्हा नवीनच ओळख होऊनही आपण त्या व्यक्तीशी  असे बोलतो की जणू काही आपली अनेक वर्षांची ओळख आहे. उगाचच आपलेपणा वाटतो. हो ना ? तसेच एखादी व्यक्ती भेटल्यावर कारण नसताना उगाच चिडचिड होते, राग राग होतो, का ? कारण तुमच्या शरीरातील सेल्स ना माहित आहे, तुमच्या मनाला माहीत आहे, कि, ती व्यक्ती कोण आहे. तुम्ही जर साधना वाढवल्यावर म्हणजे साधनेत एका ठराविक लेव्हलला गेल्यावर अतींद्रिय दृष्टीने पहाल तर तुम्हाला या व्यक्ती तुमच्या गतजन्मातील कोण होत्या, का तुम्हाला त्यांच्याबद्दल आपुलकी वाटते किंवा राग येतो, हे कळेल.

माणूस साधनेकडे का बघतो तर त्याला बऱ्याचदा हा प्रश्न पडतो की, माझ्या आयुष्यात हे सगळे प्रॉब्लेम्स का ? मलाच का हे सगळ भोगाव लागत ? तर यालाही कारण आहे, आपल्या गतजन्मातील कर्म भोग. यासाठी मग ती व्यक्ती अनेकदा ज्योतिषांकडे जाते. एकाचे नाही पटले तर दुसरा, दुसऱ्याचे नाही पटले तर तिसरा, अर्थात, त्यांनी सांगितलेले उपाय किती मनापासून आणि किती सातत्य ठेवून केलेले असतात यात शंकाच आहे. मग तर यश न आल्याने तांत्रिक मांत्रिकांचे  उंबरठे  झिजवले जातात. तिथे सुद्धा अवाच्या सव्वा पैसा जातो, हाती मात्र फक्त आणि फक्त मनस्ताप येतो. अडचणी मात्र सुटत नाहीत. कशा सुटतील ? कारण या अडचणींचे मूळ तुमच्या स्वतः मध्ये आहे आणि तुम्ही ते सोडून बाकी सगळीकडे शोधताय. एक लक्षात घ्या प्रॉब्लेमचे मुळ जर तुमच्यात आहे तर त्या घटनांना मग सोल्युशन ही तिथेच असणार ना ?

आपली अवस्था अशी नाही का झाली, ‘तुझे आहे तुजपाशी तरीही जग धुंडीशी’ किंवा ‘काखेत कळसा आणि गावाला वळसा’. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सगळे आपल्यातच आहे म्हणजे नेमके काय आणि या सगळ्यातून बाहेर पडायला नेमके काय करायचे ? सांगते, तर बघू या आधी हे सगळं काय आहे ते.

१)आपण अनेकांना त्रास दिलेला असतो. मुद्दाम असेल असं नाही पण, अनाहूतपणे ही  झालेले असू शकते. आपल्याला माहित आहे किंवा नाही पण त्या व्यक्तीच्या मनात तर आपल्याबद्दल आता राग निर्माण झाला असणार. चीड निर्माण झाली असणार. ती व्यक्ती आता आपला द्वेष करत असणार आणि आपल्याला मनातून शिव्याशाप देत असणार. आपल्याबद्दल नक्कीच वाईट विचार करत असणार. अशा वेळी या सगळ्याचा त्रास आपल्याला नक्कीच होणार. बरं हे सगळे हिशोब एखाद्या जन्मात संपले तर ठीक, नाहीतर पुन्हा ते पुढच्या जन्मात येणारच. जन्मोजन्मीचे कर्मभोग हिशोब पूर्ण झाल्याशिवाय थोडी संपणार आहेत. मग निदान आपण साधनेतून त्यांची माफी मागून ती फ्रिक्वेन्सी तरी ब्रम्हांड प्रक्षेपित करूया.

तसेच सेम आपल्यालाही कुणीतरी असा त्रास दिलेला असू शकतो मुद्दाम किंवा अनाहूतपणे, त्याला आपल्याला माफ करायचं आहे. कारण त्या व्यक्तीने दिलेल्या त्रासामुळे आपणही त्या व्यक्तीला शिव्याशाप देत असू आणि आपल्याला त्या व्यक्तीचे नाव माहीत नसेल तरीपण आपण म्हणतोच ना, ‘कोणाला बघवत नाही काय माहिती’ वगैरे वगैरे……. आणि नाव माहीत असेल तर मग तर झाले……… हे सगळे सुद्धा आपल्या कोणत्याही जन्मातले असू शकते. मग आपल्याला ही त्यांना माफ करावे लागेल. नाहीतर बघा, आपल्या मनावर एक अनामिक ओझं असतं. सगळं असून आंतरिक शांती नसते, आत्मिक शांती नसते. त्यामुळे अशावेळी या सगळ्या व्यक्तींना साधनेतून माफ करणेच योग्य आहे.

२) आपल्याला अनेक जणांचे सायकिक अॅटॅक्स आणि हूक्स  लागलेले असतात.

आता म्हणजे काय ते सांगते. एखाद्याची नजर लागणे, मग अशावेळी चालू असलेली कामे अचानक थांबतात. सगळे आर्थिक व्यवहार चांगले असताना अचानक आर्थिक आवक कमी होते. आर्थिक तंगी जाणवते. कोणत्याही प्रकारची दृष्ट लागल्याने घरातले वातावरण बिघडते. घरात शांती राहत नाही.

हूक्स म्हणजे, कोणाचे वाईट विचार आपल्यावर इतक्या प्रखरपणे अॅटॅक करतात, तिथे हूक किंवा गोळीप्रमाणे एखाद्या चक्रात किवा औरा मध्ये अडकतात. त्यामुळे अचानक धाप लागणे, भीती वाटणे, गुदमरल्यासारखे वाटणे, अशा प्रकारच्या कोणत्याही भावना निर्माण होतात.

हे सगळेच कुठूनही आलेले असतात याच जन्मातील असेल असे नाही, जर ते गतजन्मात भोगून झाले नसतील तर, या जन्मात पुढे आलेले असतात. त्याचाही त्रास होत असतो. त्यामुळे हे सायकिक अॅटॅक्स आणि हूक्स  ही काढून टाकणे  गरजेचे असते. काही प्रकारच्या मेडिटेशन्स मधून हे आपण काढून टाकू शकतो.

३) आपल्यावर असलेल्या या जन्मातील अथवा  कोणत्याही गतजन्मातील शाप काढून टाकणे.

आपण आपल्या कोणत्याही जन्मात एखाद्याला खूप वाईट बोलले असतो किंवा खूप त्रास दिलेला असतो किंवा एखाद्याचे काहीतरी वाईट केलेले असते. सहाजिकच त्यामुळे ती व्यक्ती दुखावली गेलेली असते. अशा वेळी त्यांचा शाप आपल्याला लागतो किंवा त्याने तो दिलेला असतो. त्याने मुद्दाम नसेल केले तरीसुद्धा त्यांचे मन खूप दुःखावल्यामुळे त्यांची तळतळ शाप रूपाने लागते. आपल्या अशा वागण्याने जर त्यांचे काही नुकसान झाले असेल तर त्या शापाची तीव्रता पण वाढलेली असू शकते. म्हणजे त्यांचा तळतळाट तीव्र स्वरूपाचा असू शकतो. काही जणांचा स्वभावच असतो जरा काही झाले तर फार पटकन त्या समोरच्या व्यक्तीबद्दल वाईट बोलतात. कधीकधी हे पैशाच्या रिलेटेड सुद्धा असतात. आपल्याला माहीत नसतं हे सगळं कुठून आलेलं आहे, कुठल्या जन्मातलं आहे. पण त्याचा त्रास मात्र या जन्मात होतच असतो. त्यामुळे आपल्याला आर्थिक अडचणी येतात, कारण नसताना आजारपण येतात, आणि मग समजत नसतं की सगळीकडून उपाय करून सुद्धा आपण का नाही बाहेर पडत आहे त्यातून. त्यामुळे आपल्या फिजिकल बॉडी मधून आणि औरा बॉडी मधून म्हणजे आपल्या जड देहातून आणि सप्त कोषातून हे सगळ्या प्रकारचे शाप काढून टाकणं गरजेचं असतं. त्यासाठी सुद्धा काही ठराविक प्रकारचे मेडिटेशन करणं गरजेचं असतं.

४) आपल्या प्रत्येकामध्ये राग, द्वेष, जलन, भीती, न्यूनगंड या सगळ्या भावना असतात. या प्रकारच्या भावना आपल्यासाठी चांगल्या नसतात. त्याच्यामुळे फक्त मानसिक अशांती आणि असमाधान राहते. पुन्हा त्याच्या नकारात्मक लहरी आपल्या अवतीभवती साठून राहतात, त्याचा वाईट परिणाम आपल्यावर होत असतो. मग कशासाठी हे सगळं ?  ते सोडून देणेच इष्ट. पण आता हे इतक्या अंगवळणी पडलेले असते किंवा अंगात मुरलेले असते म्हणूया. मग कसे सुटेल सहजासहजी ? नाही सुटणार. त्यासाठी सुद्धा काही मेडिटेशन ठरलेले असतात. ते केले की मग हळूहळू करत हे सगळे सुटत जाते. सवयी मोडतात. आपल्यात नक्कीच फरक दिसू लागतो.

५) अजून एक सांगते ते म्हणजे कॉर्ड कटिंग.

आता अशी कल्पना करा की, तुमच्या शरीरातून असंख्य जाड बारीक लहान-मोठे दोरखंड अनेक अदृश्य आणि माहीत असलेल्या, नसलेल्या व्यक्तींशी  जोडले गेले आहेत. त्यामुळे तुम्ही कोठेही गेलात कुठेही असलात तरी, सतत यापैकी कोणाची ना कोणाची तरी मनात आठवण येते, नको असले त्रासदायक किस्से  समोर दिसू लागतात. नको असलेल्या व्यक्ती मनात, डोळ्यासमोर नाचू लागतात. किंवा काही ठिकाणी कारण नसताना अडकल्यासारखे वाटते. काही लोकांच्या बद्दल त्यांना बघताच संताप येतो. उगाचच चिडचिड होते. त्या व्यक्तीजवळ असल्या तरी निगेटिव्हिटी जाणवते. पाहिलं तर त्यांनी आपलं फारसं काही वाईट केलेल नसत. त्यांचा काही जास्त संबंध ही नसतो. कधी कधी तर त्या व्यक्ती ओळखीच्याही नसतात. तरीही असे जाणवते कि, त्या व्यक्ती काही वेळ जरी सोबत असल्या तरी आपली एनर्जी कमी झाल्यासारखी वाटते, गळून गेल्यासारखे होते, थकवा जाणवू लागतो, अचानक मूड जातो, चिडचिड होते. असे का होत असेल ? कारण त्यांच्याशी तुमच्या निगेटिव्ह कॉर्डस् जुळल्या आहेत. त्या कॉर्डस् सुद्धा ह्या जन्मातील असतील अथवा मागील कोणत्याही जन्मातील असतील. त्या कापून टाकण फार महत्त्वाचे असते. त्यासाठी ठराविक प्रकारचे मेडिटेशन असते.

आपण बघितले की, कसे आपण सगळीकडून अडकलेले असतो. थोडक्यात अशी कल्पना करा की तुम्हाला मागे आजूबाजूला वर खाली जाड जोड दोरखंडाने बांधून त्या दोरखंडाच्या दुसऱ्या टोकाला अतिशय जड अशी लोढणी पोत्याप्रमाणे बांधली आहेत. वरच्या दिशेने एखाद्या पॅराशुट प्रमाणे असंख्य वजनदार पोती आहेत. विचार करा आता अशा परिस्थितीत, अशा वेळी तुम्ही कितीही कष्ट घेतले, कितीही मेहनत घेतली, कितीही चांगले वागलात, तरी तुमची प्रगती होईल का ? नाही ना ! मग तुम्हाला वाटते की आम्ही सगळे चांगले करूनही यश मिळत नाही. त्याचे खरे कारण तुमच्या सगळ्या या जन्मातीलच नाही तर मागच्या अनेक जन्मांच्या कर्मभोचे परिणाम आहेत. जेव्हा कर्मभोग संपायला लागतील तस तसे एकेक करत हे लागलेले जड जड लोढण्यांचे दोरखंड सुटायला लागतील. त्यानंतर आपोआप सगळ्या गोष्टी मनासारख्या व्हायला लागतील. जेव्हा हे सगळे दोरखंड सुटून जातील तेव्हा किती मोकळं वाटेल याची कल्पना तरी करा. मग हे सगळे जर सोबत असेल तर  आयुष्यात जे हवे, जेव्हा हवे, तेव्हा कसे मिळेल ? त्यासाठी हे सगळे सोडण्यासाठी योग्य पद्धतीने साधना करणं खूप महत्त्वाच आहे.

जसजशी तुमची साधना होईल तुमचे कर्म भोग कमी होत जातील आणि तुमच्या मध्ये अनेक बदल होत जातील तसतशा  आपल्या स्वतःच्या चुका समजू लागतील आणि वागण्यातही बदल होतील. साहजिकच स्वभावातही बदल होतील. आणि पुन्हा कर्मभोग तयार करायचे नाहीत हे प्रकर्षाने जाणवेल. मग जे शांत समाधानी आयुष्य असेल ते जगण्यातली मजाच काही वेगळी असेल. पण हे सगळं काही दिवसात, काही महिन्यात, लगेच होणार नाही. कारण, माहित नाही हे सगळे हिशोब किती जन्मांचे आहेत ते सगळे हिशोब चुकते  तर केले पाहिजे. एक एक करत हिशोबांचे सगळे अकाउंट बंद झाले की मग तेव्हा साधनेतून आणखी प्रगती होईल. जे हवे, जेव्हा हवे, तेव्हा मिळू लागेल. खरे आत्ताच्या कल्पनेतलं आयुष्य तुम्ही जगू लागाल. हे सगळे उगाच सांगत नाही. हे सगळं मी स्वतः साधनेत केले आहे, करत आहे. त्याचा होणारा फायदा ही अनुभवते आहे.

असेच असते, आपली कर्मे  आपली पाठ सोडत नाहीत ती भोगून संपवावी लागतात किंवा साधना करून  साफ करावी लागतात. म्हणून साधना करणे किंवा गुरु करून लगेच सगळे मिळणे इतके सोपे नाही. गुरु मिळण्यासाठीही प्रारब्धात असावे लागते. त्यांनी दिलेली हाक ऐकण्याची ताकद हवी. मुळातच गुरूवर प्रचंड विश्वास हवा, नाक घासून शरण जाण्याची तयारी हवी. तरच साधना मार्ग सोपा होतो.

लहान मुलं बघा एखादी गोष्ट मागताना किती ठाम विश्वास असतो त्यांचा की मी मागितलेली वस्तू बाबा मला आणून देणार भले लगेच नाही पण पुढच्या महिन्यात तरी मिळेल, हा त्यांचा विश्वास असतो. किंवा आईला काहीतरी खायला मागितले, करायला सांगितले तर, ती नक्की करणार आज नाहीतर उद्या, पण, करेल हे माहित असते त्याला. त्यावेळी ते मूल हा विचार करत नाही की, ही वस्तू बाबा कुठून आणतील ? कसे आणतील ? त्यांच्याकडे तेवढे पैसे आहेत का ?  किंवा आईला अमुक खायला मागितले तर, ती कसे करेल ? घरात सामान आहे की नाही ? किंवा ती  कुठून सामान आणेल ? पैसे आहेत का तिच्याकडे ? या सगळ्याशी त्या लेकराला काहीही देणं घेणं नसतं. त्याचा फक्त विश्वास असतो आणि त्यासाठी त्याला तुम्ही जसे शहाण्यासारखे वागायला सांगाल तसे ते वागते. आपण ही लेकराचा विश्वास बघून ती गोष्ट त्याला देतोच ना. तस ही आपल्याला माहित असत आपलं लेकरू आपल्याला आपल्या आवाक्या बाहेरचे काहीही मागत नाही, म्हणजे योग्य तेच मागतं.

तसेच आपल्याला ही माहित असत कि, आपण काहीही चुकीचे मागत नाही. तर  मग आपणही त्या लहान मुलांप्रमाणेच  करायचं आपल्याला जे हवे ते सांगितलं ना गुरूंना मग विश्वास ठेवा. ते कसे देतील, कधी देतील, तुम्हाला काय करायचे आहे ? आम खाने से मतलब रखो, कीस पेड का है , ये क्यू पूछना ? मिळण्याशी मतलब ठेवा आणि गुरु काय सांगतात तसेच करा. मग बघा काय चमत्कार व्हायला लागेल, पण त्या साठी थोडा वेळ द्यावाच लागेल. अर्थात त्यासाठी गुरु ही त्याच तोडीचा असावा. उगाचच कोणालाही गुरु करून पैसा उधळू नका.

आता खरी साधनेला सुरुवात करा. जर मंत्र घेतला असेल तर सांगितल्याप्रमाणे जप करा. जर शक्तिपात दीक्षा घेतली असेल, त्या गुरूंच्या सांगण्याप्रमाणे साधना करत रहा. अर्धवट सोडू नका. रेकीची दीक्षा घेतली असेल तर त्या पद्धतीने करा. कोणत्याही प्रकारची दीक्षा घेतलीच नसेल तर, रोज किमान १५ ते २० मिनिटे ठराविक वेळी फक्त शांत बसा.

त्यावेळी श्वासावर लक्ष केंद्रित करा. विचार येत असतील तर त्यांना जाऊ द्या. विचारांवर विचार करत बसू नका. पाहिजे तर त्या विचारांना नंबर द्या पहिला आला एक, दुसरा आला दोन, तिसरा आला तीन, असे आणि बघा आज साधारण  शंभर विचार आले, उद्या थोडे कमी येतील, परवा आणखी कमी होतील, असं करत करत हळूहळू विचार येणे संपून जाईल, आणि शांत वाटायला लागेल. एक दिवस असा येईल की विचार पूर्णपणे बंद होतील. पण या प्रोसेसमध्ये शक्य असेल तर जसे शांत वाटू लागेल, विचार थांबून कमी होऊ लागतील, तसे हळूहळू वेळ वाढवावा. कोणतीही साधना करताना सुरुवात पंधरा ते वीस मिनिटं पासून करून हळूहळू वेळ वाढवत न्या. मग जितका जास्त वेळ बसू शकाल तितका वेळ बसा.

हीच प्रोसेस वरीलपैकी कोणत्याही प्रकारची दीक्षा घेतली तरीही होणारच आहे , फक्त ती थोडी गतिमान असेल म्हणजे कसे बघा हं ! मी बऱ्याचदा  हे उदाहरण देत असते की जर तुम्हाला आंघोळ करताना साबण, शाम्पू, अंग घासायचा पफ दिला आणि आंघोळ करायला सांगितले आणि नुसतेच पाण्याने आंघोळ करायला सांगितले बाकी काही तुम्हाला दिलेलं नाहीये, मग या दोन्ही आंघोळी मध्ये काय फरक असेल ? आंघोळ तर दोन्ही प्रोसेस मध्ये होणार आहे. पण साबण, शाम्पू, वगेरे वापरल्याने  क्लीनिंग जास्त चांगल होणार आहे. तसं नुसतं पाण्याने अंघोळ केल्याने होणार नाहीये. आणि त्या इतके क्लीनिंग होण्यासाठी नुसत्या पाण्याने अंघोळ करताना जास्त वेळ लागणार आहे. पण तरीही तेव्हडे क्लिनिंग होईल असे नाही. तर तो फरक या दीक्षा घेऊन साधना करणे आणि नुसती कुठल्या प्रकारची दीक्षा न घेता केलेली साधना यांच्यामधला फरक आहे.

अशा प्रकारे  ह्या प्रोसेस मध्ये थोडा वेळ लागेल. बरेचदा साधना सुरू केल्यावर शरीरात उष्णता वाढते आणि शरीरातली नकारात्मक ऊर्जा म्हणजेच निगेटिव्हिटी बाहेर पडायला सुरुवात होते. अशावेळी आपल्याला वाटते की आपण काहीतरी चुकीचे करत आहोत आणि साधना सोडून दिली जाते. पण तसे न करता नेटाने साधना चालू ठेवावी. रोज पाणी पिण्याचे प्रमाण वाढवावे. कारण निगेटिव्हिटी बाहेर पडेल तर ती कोणत्या मार्गाने बाहेर पडेल ? शरीराचे उत्सर्जन मार्ग म्हणजे युरीन पास होणे, टॉयलेटला सारखे जावे लागणे, घाम येणे ,उलटी होणे, डोळ्यातून पाणी येणे, रडावेसे वाटणे. यातला सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे खालून सगळे बाहेर जाणे. म्हणून पाणी जास्त प्यावे. त्यामुळे सारखे वॉश रूमला जाऊन सगळे बाहेर पडते. काही जणांना साधनेला बसल्यावर खूप भरून आल्यासारखे वाटते, रडावेसे वाटते आणि डोळ्यातून पाणी वाहू लागते. जाऊ देत, रडून मोकळे व्हा. नंतर हलके वाटते. कधीकधी टॉक्सिन्स जर खालून बाहेर पडले नाहीत तर डोके किंवा हात पाय असा एखादा अवयव प्रचंड दुखतो. मग काहीही करा औषध घ्या, दाबून घ्या, बाम लावा, तरीही दुखायचे कमी होत नाही, जोपर्यंत ते टॉक्सिन्स बाहेर पडत नाहीत तोपर्यंत दुखते. त्यामुळे पाणी भरपूर प्या आणि कोणत्याही त्रासा शिवाय सगळे खालून बाहेर पडू द्या. अशावेळी डिसेंट्री झाली तरी घाबरू नये किंवा औषधे घेऊ नये सगळे बाहेर पडू द्या.

अजून खूप आहे. हे सगळे एवढंच नाही पण निदान आपल्या संसार रुपी सागरातील आपल्या आयुष्यातील एक छोटासा भाग दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. कारण जोपर्यंत ह्या सगळ्याची जाणीव होणार नाही, तोपर्यंत त्यातून बाहेर पडण्याची इच्छा होणार नाही. त्यामुळे हे सगळे समजून घ्या, जाणून घ्या, विचार करा, स्वतःच्या बाबतीत हे सगळे खरंच घडते आहे का ?

हे सगळे मी सतत बघते आहे आजूबाजूला, अनुभवते आहे. त्यामुळे मी माझ्या बऱ्याच लेक्चर मध्ये याबद्दल बोलत असते. वेगवेगळे मेडीटेशन्स सतत घेत असते. रेकीच्या, एंजल च्या  माध्यमातून साधना कशी करायची हे शिकवते, तेव्हापासून बऱ्याच जणांनी यावर काम चालू केले आहे आणि त्यांच्या आयुष्यात झालेले आणि होत असलेले बदल ही वेळोवेळी सांगत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *